Wednesday, 23 July 2025

 

इन्स्टंट नूडल्स सतत खाल्ल्याने पचन बिघडते, ५ दुष्परिणाम; आरोग्य धोक्यात का घालता.....?




नूडल्स म्हणजे अनेकांच्या अतिशय आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. अगदी २ मिनीटांत होणारे आणि पोटभरीचे असे हे नूडल्स काही जण नियमित खातात. मोठमोठ्या कंपन्याही त्याची आकर्षक पद्धतीने जाहिरात करतात आणि आपले उत्पादन खरेदी करण्यास ग्राहकांना भरीस पाडतात. मॅगीसारखे नूडल्स तर अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण आवडीने खातात. यामध्ये चीज, भाज्या, बटर असे घालून याची चव आणखी वाढवली जाते. तर चायनिज पदार्थ आवडणारेही आपल्या आजुबाजूला असंख्य जण असतात आणि हे लोक आवडीने शेजवान नूडल्स किंवा तत्सम वेगवेगळ्या फ्लेवरचे नूडल्स खातात. मात्र हे नूडल्स एकतर मैद्यापासून तयार झालेले असतात आणि त्यामध्ये इतरही हानिकारक घटक असल्याने ते आरोग्यासाठी म्हणावे तितके फायदेशीर नसतात. त्यामुळे नूडल्स खाणे टाळलेले केव्हाही चांगले.

 

पाहूयात नूडल्स खाणे का धोक्याचे असते याविषयी..

१. सोडीयमचे जास्त प्रमाण...

नूडल्समध्ये सोडीयमचे प्रमाण जास्त असते. यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. रक्तदाब वाढला की त्याचा हृदय आणि इतर अवयवांवर परीणाम होतो आणि परीणामी शरीराचे कार्य बिघडते.

 

२. प्रिझर्व्हेटीव्हचे प्रमाण जास्त...

फळं, भाज्या, दूध, डाळी, धान्य यांसारख्या नैसर्गिक पदार्थांचा आहारात समावेश असायला हवा असे वारंवार सांगण्यात येते. पॅकेट फूड म्हणजेच प्रिझर्वेटीव्ह असणारे पदार्थ शक्य तितके टाळायला हवेत असे सांगितले जात असताना आपण आहारात जास्तीत जास्त पॅकेट फूडचा समावेश करतो. मॅगी किंवा नूडल्स दिर्घ काळ टिकावेत यासाठी त्यामध्येही प्रिझर्वेटीव्ह जास्त प्रमाणात घालण्यात येतात. ते आरोग्यासाठी चांगले नसल्याने शक्यतो टाळायला हवेत.

 

३. अनावश्यक फॅटचे प्रमाण जास्त...

आपल्याला अन्नातून चांगले फॅटस आणि वाईट फॅटस असे २ प्रकारेच फॅटस मिळतात. नूडल्समध्ये वाईट प्रकारच्या फॅटसचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढण्याची शक्यता असते. कोलेस्टेरॉल वाढले तर हृदयरोगाचा त्रास होऊ शकतो.

 

 ४. मेटाबॉलिक समस्या...

नूडल्समुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे, वजन वाढणे, रक्तदाब वाढणे अशा समस्या उद्भवतात. या समस्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याने शक्यतो आहारात नूडल्ससारखे पदार्थ टाळलेले केव्हाही चांगले.

 

५. पोषक घटकांची कमतरता...

नूडल्समध्ये शरीराला आवश्यक असणारे विशेष कोणतेच घटक नसतात. यामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते, मात्र यात प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन्स, खनिजे यांचे प्रमाण खूपच कमी असते. त्यामुळे हे खाऊन शरीराला काहीच फायदा होत नसल्याने आहारात या घटकांचा समावेश टाळलेला चांगला.

 

संकलन-

निसर्ग उपचार तज्ञ

डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.

आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक 

Tuesday, 22 July 2025

 

 

    हळदीच्या सेवनाने झपाट्याने कमी होईल खराब

    कोलेस्ट्रॉल?

 

              प्राचीन काळापासून हळदीचा वापर आरोग्यासाठी केला जातो. कोलेस्ट्रॉलच्या समस्येवरही हळद उपयुक्त ठरू शकते. फक्त वापरण्याची पद्धत एकदा जाणून घ्या

                हळद आपल्याला प्रत्येक घरामध्ये पाहायला मिळते. हळदीचा वापर सामान्यतः घरांमध्ये जेवण चवदार बनवण्यासाठी केला जातो. त्वचेचे सौंदर्य वाढवण्यापासून ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हळद खूप फायदेशीर आहे. हळदीचा वापर प्राचीन काळापासून संसर्ग, जखम आणि पोटाच्या समस्यांसाठी केला जातो. हळद हा अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे जी कर्करोग आणि मधुमेह यांसारख्या रोगांवर उपचार करण्यास मदत करते. हळदीचे आरोग्यदायी फायदे बाजारात सहज उपलब्ध आहेत आणि ती विविध प्रकारे वापरली जाऊ शकते. हळद रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवून हृदय निरोगी ठेवण्यास देखील मदत करू शकते. चला जाणून घेऊया हळदीचे सेवन कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी कसे उपयुक्त ठरते?

 

 हृदयविकारात फायदेशीर

             शरीरात उच्च कोलेस्ट्रॉल म्हणजे तुम्हाला हृदयविकाराच्या झटक्यापासून स्ट्रोकपर्यंत कोणत्याही गोष्टीचा धोका असू शकतो. अशा परिस्थितीत हळदीसोबत कोलेस्टेरॉलची पातळी राखण्यासाठी वेळोवेळी अनेक अभ्यास आणि संशोधन केले गेले आहेत. प्राणी आणि मानवांवर केलेल्या संशोधनानुसार हळदीचे सेवन केल्याने रक्तातील कोलेस्टेरॉलच्या पातळीवर तीन प्रकारे परिणाम होतो.

 

 1) LDL कोलेस्टेरॉलची पातळी कमी करणे...

            लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन म्हणजेच LDL कोलेस्टेरॉलला वाईट कोलेस्ट्रॉल म्हणतात आणि त्यामुळे हृदयाच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. हळदीचे सेवन केल्याने एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते, ज्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

 

 2) ऑक्सिडेशनपासून एलडीएल कोलेस्टेरॉलचे संरक्षण

          एथेरोस्क्लेरोसिस तेव्हा होतो जेव्हा एलडीएल कोलेस्टेरॉल ऑक्सिजनसह प्रतिक्रिया देते, ज्यामुळे रक्ताभिसरणात अडथळा येऊ शकतो. हळदीचे सेवन केल्याने हे ऑक्सिडेशन थांबते, त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते आणि रक्तवाहिन्याही निरोगी राहतात.

 

 3) ट्रायग्लिसराइड पातळी कमी करणे

                उच्च रक्तातील कोलेस्टेरॉलसह उच्च ट्रायग्लिसराइड पातळी हृदयाच्या आरोग्यास धोका निर्माण करू शकते. ट्रायग्लिसराइड देखील धमन्यांमध्ये तयार होते, ज्यामुळे LDL कोलेस्टेरॉल रक्ताभिसरण समस्या निर्माण करणे सोपे होते. हळदीच्या वापराने ट्रायग्लिसराइडचे प्रमाण नियंत्रित करता येते.

 

            हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रोज भाज्यांमध्ये हळदीचा वापर करावा. तसेच रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधात चिमूटभर हळद टाकून प्यावे. याशिवाय रोज एक कप ग्रीन टी प्यायल्याने उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.

 

संकलन-

निसर्ग उपचार तज्ञ

डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.

आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक

Friday, 18 July 2025


 

तुमच्या शरीरात कोणतं अंग तुमच्यावर रुसलेलं आहे?

 


आपण सगळेच कुठे ना कुठे त्रास अनुभवत असतो कुणाला थकवा जाणवतो, कुणाचं पचन नीट होत नाही, कुणाला भूक लागत नाही तर कुणी सतत चिडचिड करत असतो. पण हे सगळं होतंय नेमकं का?

तुमचं शरीर तुमच्याशी बोलतंयपण आपण त्याचं ऐकत नाही!

 

थोडं लक्ष देऊन पाहा

तुम्हाला हे त्रास जाणवतात का?

सकाळी उठतानाच अंग थकल्यासारखं वाटतं

चेहरा काहीसा फिकट दिसतो

डोकं नेहमी जड-जड वाटतं

खाल्ल्यावर पोट सुजल्यासारखं होतं

थोडंसं खाल्लं कीही पोट भरल्यासारखं वाटतं

एकूणच उत्साह कमी झालाय

जर या पैकी 2-3 लक्षणं तुमच्यात असतीलतर हे लिव्हरचं 'रुसणं' असू शकतं!

लिव्हर रुसतं म्हणजे काय?

लिव्हर म्हणजे आपल्या शरीराचा 'फिल्टर' – शरीरातले टॉक्सिन्स, केमिकल्स, हॉर्मोन्स, औषधांचे अंश यांचं शुद्धीकरण हे लिव्हरचं मुख्य काम.

आपण जास्त oily जेवण, junk food, दारू, साखर, रात्रभर जागरण किंवा तणाव यामुळे लिव्हरवर भार टाकतो. आणि हळूहळू लिव्हर थकायला लागतं.

 

थकलेलं लिव्हर हे एकदम गप्प बसत नाही

ते लक्षणांच्या रूपाने तुम्हाला सांगतंकी

"माझ्याकडे लक्ष दे!"

 

मग उपाय काय?

सकाळी कोमट पाण्यात लिंबू आणि थोडं मध घेणं लिव्हर डिटॉक्ससाठी उत्तम.

आवडत असलं तरी पिझ्झा, बर्गर, फ्राईड पदार्थ कमी करा लिव्हरला थोडा आराम मिळू दे.

संध्याकाळी उशिरा खाणं टाळा लिव्हर रात्री रिपेअर मोडमध्ये जातं.

दररोज 20 मिनिटं चालणं किंवा योगासनं करा रक्तप्रवाह वाढतो आणि लिव्हरला मदत होते.

दिवसातून 8-10 ग्लास पाणी प्या टॉक्सिन्स बाहेर जाणं सोपं होतं.

तुमचं लिव्हर तुमच्यावर रुसलेलं असेलपण थोडं प्रेम, थोडी काळजी आणि थोडं लक्ष दिलंत, की ते लगेच खुश होतं!

लक्षात ठेवा आरोग्य म्हणजे केवळ औषध नव्हे, तर शरीराशी मैत्री करण्याची एक सुंदर प्रक्रिया आहे.

संकलन-

निसर्ग उपचार तज्ञ

डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.

आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक

                 

   फ़ंगल इन्फेक्शन वर काही माहिती.....

 


फंगल इन्फेक्शन (बुरशीजन्य संसर्ग) ही एक सामान्य समस्या आहे जी बुरशीमुळे होते. ही बुरशी आपल्या आजूबाजूच्या वातावरणात असते आणि शरीराच्या विविध भागांना जसे की त्वचा, नखे आणि केसांना संक्रमित करू शकते.

फंगल इन्फेक्शन कशामुळे होते?

 

फंगल इन्फेक्शन होण्याची अनेक कारणे आहेत:

 

उष्ण आणि दमट वातावरण: बुरशीला वाढण्यासाठी उबदार आणि ओलसर वातावरण आवडते. त्यामुळे अशा वातावरणात फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते, विशेषतः पावसाळ्यात.

 ओले कपडे घालणे: ओले कपडे जास्त वेळ घातल्याने त्वचेवर बुरशी वाढू शकते.

 घाम: ज्यांना जास्त घाम येतो त्यांना फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते.

 कमजोर रोगप्रतिकारशक्ती: ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमजोर असते, त्यांना फंगल इन्फेक्शनचा धोका अधिक असतो.

 वैयक्तिक स्वच्छतेची काळजी न घेणे: योग्य स्वच्छतेचा अभाव हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे.

 घट्ट शूज किंवा कपडे घालणे: यामुळे त्वचेला हवा लागत नाही आणि घाम जमा होऊन बुरशी वाढते.

 मधुमेह (डायबिटीज): मधुमेहाच्या रुग्णांना फंगल इन्फेक्शनचा धोका जास्त असतो.

 संक्रमित व्यक्तीच्या वस्तू वापरणे: संक्रमित व्यक्तीचे कपडे, टॉवेल किंवा इतर वस्तू वापरल्याने हा आजार इतरांना पसरू शकतो.

 स्टिरॉइड क्रीमचा वापर: काहीवेळा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्टिरॉइड क्रीम वापरल्याने इन्फेक्शन वाढू शकते.

 

फंगल इन्फेक्शनची लक्षणे:


 फंगल इन्फेक्शनची काही सामान्य लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:

  * त्वचेला खाज सुटणे.

  * त्वचेवर लाल रंगाचे गोल चट्टे येणे (उदा. दाद किंवा रिंगवर्म).

  * त्वचेतून पांढऱ्या रंगाचा पदार्थ निघणे (उदा. यीस्ट इन्फेक्शनमध्ये).

  * त्वचेला भेगा पडणे किंवा फटी पडणे.

  * जळजळ होणे.

  * सतत केस गळणे (टाळूवरील फंगल इन्फेक्शनमध्ये).

  * नखांचा रंग बदलणे किंवा नखे जाड होणे (नखांच्या बुरशीमध्ये)

.

 फंगल इन्फेक्शनचे प्रकार:

 

फंगल इन्फेक्शनचे काही मुख्य प्रकार:


 ऍथलीट्स फूट (Athletes Foot): हा पायांवर होणारा सामान्य बुरशीजन्य संसर्ग आहे, ज्यात खाज सुटणे, जळजळ होणे आणि त्वचेला भेगा पडणे ही लक्षणे दिसतात.

 दाद (Ringworm): हा अत्यंत संसर्गजन्य बुरशीजन्य संसर्ग आहे जो त्वचा, टाळू आणि नखांना प्रभावित करतो. यात लाल, गोलाकार पुरळ आणि खवलेयुक्त त्वचा दिसते.

 जॉक इच (Jock Itch): हा जांघेच्या भागात होणारा संसर्ग आहे, ज्यात खाज सुटते आणि लालसरपणा येतो.

 कँडिडा इन्फेक्शन (Candidiasis): हे यीस्ट (कँडिडा) मुळे होते आणि तोंडाच्या आत (थ्रश), योनीमार्गात किंवा त्वचेच्या पटलांमध्ये होऊ शकते.

 

फंगल इन्फेक्शनवर उपचार आणि घरगुती उपाय:


 फंगल इन्फेक्शनवर उपचार करण्यासाठी डॉक्टर अँटीफंगल क्रीम, पावडर किंवा गोळ्या देतात. पण काही घरगुती उपाय देखील फायदेशीर ठरू शकतात:

 स्वच्छता: संक्रमित भाग साबण आणि पाण्याने दिवसातून दोनदा स्वच्छ करा. यामुळे संसर्ग पसरण्यापासून रोखण्यास मदत होईल.

 कोरडे ठेवा: त्वचा नेहमी कोरडी ठेवा, विशेषतः आंघोळीनंतर. ओलसर ठिकाणी बुरशी वाढते.

 मोकळे कपडे: सैल आणि सुती कपडे वापरा जेणेकरून त्वचेला हवा मिळेल.

 लसूण: लसूण ठेचून ऑलिव्ह ऑइलमध्ये पेस्ट करून संक्रमित भागावर लावा. लसूणमध्ये अँटीफंगल गुणधर्म असतात.

 हळद: हळदीचा लेप पाण्यात भिजवून संक्रमित भागावर लावा. हळदीमध्ये अँटीफंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात.

 कडुलिंब: कडुलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून खाज येणाऱ्या ठिकाणी लावल्याने इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते.

 कोरफड (Aloe Vera): कोरफडीचे जेल त्वचेला शांत करते आणि बरे होण्यास मदत करते.

 खोबरेल तेल: खोबरेल तेल बाधित भागावर लावल्याने खाज सुटणे आणि जळजळीपासून आराम मिळतो.

 ऍपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar): व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात मिसळून कापसाच्या बॉलने लावा. यामुळे त्वचेचा पीएच संतुलित राहतो आणि बुरशीची वाढ रोखण्यास मदत होते.

 

संकलन-

निसर्ग उपचार तज्ञ

डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.

आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक 

Wednesday, 16 July 2025

 

   

   सुंठ

 


🌿 सुंठीचे फायदे (Health Benefits of Dry Ginger)

  1. पचनासाठी फायदेशीर
    – अन्नपचन सुधारते
    – गॅस, अपचन, मळमळ यावर गुणकारी
    – भूक वाढवते

  2. सर्दी-खोकल्यावर उपाय
    – गरम पाण्यात सुंठ टाकून प्यायल्यास सर्दी कमी होते
    – मधासोबत घेतल्यास कफ सुटतो

  3. सांधेदुखी व सूज यावर उपयोगी
    – अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म
    – संधिवात आणि गुडघेदुखीवर आराम मिळतो

  4. मासिक पाळीच्या तक्रारींवर
    – सुंठ, गूळ आणि गरम पाणी यांचं सेवन मासिक पाळीतील वेदना कमी करतं

  5. रक्तसंचार सुधारतो
    – शरीरात उष्णता निर्माण करून रक्ताभिसरण सुधारतो

1) हे कंद जेव्हा ओला असतो तेव्हा त्याला आलं, अदरक असे म्हणतात. तोच कंद वाळला असता त्याला सुंठ म्हणतात. दोन्ही मूलत: एकच असले तरी दोघांच्या गुणधर्मात खूप फरक आहे.

 

2) आलं हे कटु, उष्ण, तीक्ष्ण व रुक्ष असल्याने कफाचा नाश करणारे आहे. म्हणून पावसाळ्यात, हिवाळ्यात त्याचा वापर मुद्दाम जास्त करावा.

 

3) आलं हे अग्निदीपक आहे. भूक लागत नसेल, अजीर्ण झाले, तोंडाला चव नसेल तर आले द्यावे. जेवणापूर्वी 1/2 तास अगोदर आल्याचा तुकडा मिठासोबत खावा किंवा आल्याचा रस एक चमचा आणि थोडेसे काळे मीठ टाकून घ्यावे. यामुळे भूक लागते.

 

4) पडसे, खोकला असताना आल्याचा रस पिंपळीपूर्ण व मधासोबत द्यावा. हा प्रयोग दिवसातून तीन वेळा करावा.

 

5) आल्याचा रस मधासोबत दिल्याने उचकीसुद्धा कमी होते. संपूर्ण अंगावर सूज येत असेल तर आले गुळासोबत खाल्लयाने फायदा होतो.

 

6) आल्यापासून आल्याचा कीस, सुपारी, पाक बनविता येतात. आल्याचा पाक करताना आल्याच्या रसात विलायची, जायफळ, लवंग, पिंपळी, काळी मिरी, हळद, साकर टाकावी. यामुळे आलेपाक जास्त गुणकारी बनतो.

 

7) सुंठीवाचून खोकला गेला' ही म्हणं असली तरी खरोखरचा खोकला हा सुंठीशिवाय जात नाही हेच त्यातून स्पष्ट होते.

 

8) आल्याचा कंद वाळला असता त्याला सुंठ म्हणतात. सुंठ ही कटू, लघु, तीक्ष्ण, स्गिन्ध असली तरी शरीरावर तिचा परिणाम मधुर विपाकामुळे होतो. मधुर असल्यामुळे तिचा वापर दौर्बल्यात होतो. अशक्त व्यक्तींना किंवा बाळंतपणामुळे आलेल्या अशक्तपणात सुंठीचा शिरा देतात. चांगल्या तुपात भाजून साखर टाकून केलेला हा शिरा बलवृद्धी करतो. या शिर्यामुळे आम्लपित्तसुद्धा कमी होते.

 

9) सुंठ पावडर रात्रभर एरंडेल तेलात भिजवावी. सकाळी हे सर्व मिश्रण पीठात टाकून त्याच्या पोळ्या खायला द्याव्या. यामुळे आमवात निश्चितपणे कमी होतो.

 

10) याशिवाय सुंठही खोकल्यावरील रामबाण औषध आहे. सुंठीची काळी राख किंवा सुंठ पावडर मधासोबत दिल्याने खोकला कमी होतो. तसेच पडसे असताना सुंठ, दालचिनी व खडीसाखरेचा काढा करून द्यावा. खोकला व पडशामुळे डोके दुखत असेल तर सुंठ पावडरचा गरम लेप डोक्यावर व छातीवर लावावा. याने डोकेदुखी थांबते व खोकलाही कमी होतो. सुंठीचे अनेक फायदे असले तरी सुंठ ही पित्ताचे व त्वचेचे विकार असणार्यांनी वापरू नये. तसेच सुंठ उष्ण असल्यामुळे उन्हाळ्यात वापरू नये.

 

🧪 कसा वापरायचा?

उपयोगपद्धत
सर्दी       सुंठ + मध दिवसातून २ वेळा
पचन       अर्धा चमचा सुंठ चूर्ण गरम पाण्यासोबत
सांधेदुखी       सुंठ पावडर + तिळाचं तेल लावावं
मासिक वेदना       सुंठ + गूळ + गरम पाणी

⚠️ सावधगिरी

  • जास्त प्रमाणात घेतल्यास तोंडात आग किंवा जळजळ होऊ शकते

  • उष्ण प्रकृतीच्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

संकलन-

निसर्ग उपचार तज्ञ

डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.

आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक

Tuesday, 15 July 2025

 

 

  आरोग्यदायी बेलफळ




बेलफळाचे औषधी फायदे

  1. पचनासाठी उत्तम
    बेलफळ पचायला हलकं असून त्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. ते अपचन, गॅस, अ‍ॅसिडिटी, आणि जुलाबावर उपयोगी ठरतं.

  2. उष्णतेपासून संरक्षण
    उन्हाळ्यात बेल सरबत प्यायल्याने शरीरात थंडी निर्माण होते आणि उष्माघात (Heatstroke) टाळता येतो.

  3. डायबेटीसवर मदतकारी
    बेलफळाच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रित राहते. यामध्ये लॅक्सेटिव्ह गुणधर्म असल्यामुळे ते यकृतासाठीही फायदेशीर असते.

  4. आयुर्वेदिक औषध म्हणून वापर
    बेलफळाचा उपयोग आयुर्वेदात बिल्वादी लेह्यत्रिफळाबेल चूर्ण अशा औषधांमध्ये केला जातो.

  5. रोगप्रतिकारशक्ती वाढवते
    त्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्समुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.


बेलाचे सरबत: आरोग्यासाठी फायदेशीर.

चन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या कमी होतात.

 

शरीर थंड ठेवते: बेलाचे सरबत उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे उष्माघाताचा धोका कमी होतो.

 

रक्त शुद्ध करते: बेलाच्या सरबतातील गुणधर्मांमुळे रक्त शुद्ध होते, ज्यामुळे हृदय निरोगी राहते.

 

मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर: बेलाचे सरबत रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे ते मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर आहे.

 

ऊर्जा वाढवते: बेलाचे सरबत प्याल्याने शरीराला ऊर्जा मिळते, ज्यामुळे थकवा कमी होतो.

 

हृदयासाठी चांगले: बेलाचे सरबत उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे हृदय निरोगी राहते.

 

त्वचेसाठी फायदेशीर: बेलाचे सरबत त्वचेला ताजे आणि चमकदार बनवते, तसेच त्वचेच्या समस्यांवर आराम देते.

सावधगिरी

  • गरम पित्त असणाऱ्यांनी किंवा खूप प्रमाणात सेवन करणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


संकलन-

निसर्ग उपचार तज्ञ

डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.

आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक

  इन्स्टंट नूडल्स सतत खाल्ल्याने पचन बिघडते , ५ दुष्परिणाम ; आरोग्य धोक्यात का घालता..... ? नूडल्स म्हणजे अनेकांच्या अतिशय आवडीचा आणि जिव...